साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने

अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट, १९२० रोजी झाला. अण्णा भाऊ वाटेगावचे, ते ४९ वर्षे जगले. १८ जुलै, १९६९ साली त्यांचा मृत्यू झाला. दारिद्र्य, बेकारी, भूक यांबरोबर संघर्ष करीत ते जगले. वाटेगावला जगणे शक्य नाही म्हणून वडील भाऊ साठे यांच्याबरोबर ते पायी चालत मुंबईला गेले. माटुंगा लेबर कँपमधील झोपडपट्टीत ते; वडील, लहान भाऊ शंकर व दोन बहिणींसह राहिले. पोटभर अन्नाची पंचाईत म्हणून त्यांनी वाटेगाव सोडले. ना जमीन, ना धंदा, ना शिक्षण! फक्त गावकीची कामे होती. मांग जातीत जन्म घेतल्यामुळे दोरखंडे वळायची; पण पोटभर अन्न मिळत नव्हते. त्यांची आई वालूबाई त्यांना शिकायचा आग्रह धरी. अण्णा भाऊ शाळेला जायला तयार नव्हते. गुरुजी त्यांना वर्गात घेत नव्हते. दलितांनी शिकायचे कशाला हा त्यांचा प्रश्न होता. आईला ते म्हणाले, ‘शाळेत गेलो नाही, तर मरणार नाही. गेलो तर जगेन असेही नाही.’

अण्णा भाऊ मुंबईला गेले. मुंबईला हमाली, कोळसा वाहणे, खाणकाम, गिरणी कामगार, अशी मिळतील ती कामे केली. माटुंगा झोपडपट्टीत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय होते. तिथे ‘लाल बावटा युनियन’ जोरात होती. कॉम्रेड अण्णा भाऊंची जडणघडण तिथेच झाली. कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढ्याकडे ते तिथेच ओढले गेले. अण्णा भाऊंकडे जन्मजात प्रतिभा होती. गोड गळा, संघर्षात उडी घ्यायची प्रवृत्ती यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पंख फुटले. कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकत्यांनी त्यांच्यातले स्फुल्लिंग हेरले. त्यांना लिहिते केले, गाते केले. लिहायला कम्युनिस्ट कार्यालयाची जागा मिळाली. पोटात अन्नाचा कण नाही; पण हातातला डफ आणि लेखणी यात खंड पडला नाही.

वाटेगावात दारिद्र्य अनुभवले होते. मुंबईत काम मिळाले. राहायला झोपडपट्टी होती. झोपडपट्टी म्हणजे ना पाणी, ना गटार, ना दिवे, ना संडास ! चोर, भिकारी, भटके, उचले लोकांची ती वस्ती होती. दारू, गांजा, अफू ही व्यसने होती. जगता जगता जे अनुभवले, तेच लिहिले. अण्णा भाऊ साठे, शाहीर दत्ता गव्हाणकर, अमर शेख हे त्रिकूट एकत्र आले. सारी मुंबई आणि महाराष्ट्र पेटवून, चेतवून टाकला. संयुक्त महाराष्ट्राचे वादळ घोंगावत होते. १०५ हुतात्म्यांची आहुती पडली होती. गिरणीमालक कामगारांना छळत होते. श्रमिकांना हक्कासाठी जागवणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे यासाठी डफावर थाप देऊन गायचे व जिवंत अनुभव मांडण्यासाठी लेखणी हत्यारासारखी वापरायची, उरलेल्या वेळेत पोटासाठी वणवण फिरायचे, असा त्यांचा क्रम होता. ‘केवळ चार घटका करमणूक करायची म्हणून मी लिहिले नाही.’ असे अण्णा भाऊ नेहमी म्हणत.

कथाकार, कादंबरीकार, शाहीर, तमाशा व वगनाट्याचे लेखक, अशी त्यांची साहित्यिक कामगिरी आहे. लोकशाहीर अशी पदवी त्यांना मिळाली. जनतेची नाडी तपासणारा शाहीर, असा त्यांचा गौरव झाला. त्यांनी साहित्यातून सत्यसृष्टी रेखाटली. “माझ्या साहित्यातली माणसं मला भेटलेली असतात. त्यांचं जगणं, मरणं मला माहीत आहे.” असा अस्सलपणा त्यांच्या साहित्यात आहे. साहित्यिकांना ते सांगतात, “साहित्यिकानं (आपल्या साहित्यावर) वाघिणीप्रमाणं प्रेम करावं, वाघिणीचं एखादं पिल्लू मलूल अगर चपळ निघालं नाही, तर वाघिण स्वत:हून ते पिल्लू खाऊन टाकतं. त्याप्रमाणं साहित्यिकानं स्वतःच्या चुका गिळून टाकाव्यात व समृद्ध ते राहू द्यावं.” वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते, हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो.” वैजयंताच्या प्रस्तावनेत ते पुढे म्हणतात, “पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, ती दलितांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.” अण्णा भाऊंचा दलित शब्द जातिवाचक नाही. शोषित, श्रमजीवी मग तो कुणीही असो तो दलित, असे ते म्हणतात.

अण्णा भाऊंच्या साहित्यावर रसिकांनी उदंड प्रेम केले. अण्णा भाऊंनी प्रचंड अशी साहित्य निर्मिती केली. तेरा कथासंग्रह, चाळीस कादंबर्‍या, चौदा वगनाट्ये, दहा पोवाडे, गीते यांचा संग्रह, एक नाटक, एक प्रवासवर्णन यांचा समावेश आहे. त्यांच्या ‘#फकिरा’ कांदबरीच्या ३५ आवृत्त्या निघाल्या. ‘वारणेचा वाघ’ कादंबरी लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली. ‘चित्रा’ कादंबरी कन्नड, रशियन, पोलिश भाषेत भाषांतरित झाली. ‘वारणेचा वाघ’ गुजराथी भाषेत प्रचंड लोकप्रिय झाली. ‘फकिरा’ हिंदी आणि पंजाबी भाषेत लोकप्रिय झाली. वि. स. खांडेकरांनंतर परभाषेत भाषांतरित होणारे मराठीतील साहित्यिक म्हणजे अण्णा भाऊ साठे होय. अण्णा भाऊंच्या कथा, कादंबऱ्या रशियन विद्यापीठात अभ्यासक्रमाला नेमल्या गेल्या. इंडो सोव्हिएट कल्चरल सोसायटी मार्फत ते रशियाला गेले. रशियात त्यांचा सत्कार झाला. अनेक विद्यापीठांत व्याख्याने झाली. १९६१ साली माझा रशियाचा प्रवास’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मराठीतल्या प्रस्थापित समीक्षकांनी त्याची नोंद घेतली नाही. डॉ. कुसुमावती देशपांडे यांच्या ‘मराठी कादंबरी पहिले शतक १८५०-१९५०’ या पुस्तकात अण्णा भाऊंचा उल्लेख नाही.

या देशात ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार नसलेल्यांनी ज्ञान मिळविल्यास एक तर मृत्यू किंवा विद्या परत करावी लागत असे. जसे शंभुकाने ज्ञान प्राप्त केल्याने त्याचा शिरच्छेद करण्यात आला, तर एकलव्याला गुरूदक्षिणेच्या स्वरुपात उजव्या हाताचा अंगठा गमवावा लागला. अशा मनुवादी गुरू द्रोणाचार्याच्या नावाने आपले शासन पुरस्कार देते, अशी कुटिल प्रवृत्ती जगात कोठेही नसेल. शाहीर अण्णा भाऊ साठे हे युगप्रवर्तक असे साहित्यक होऊन गेले. त्यांनी दलितांचे जीवन, दलितांच्या व्यथा, कथा, भाव भावना यांचे यथार्थ चित्रण करणारे साहित्य खऱ्या अर्थाने निर्माण केले. सवर्णांच्या लेखक मंडळीतून जे सावकारी जीवनाचे, समृद्ध श्रीमंत जीवनाचे, पारंपरिक साहित्य विपुल प्रमाणात लिहिले जात होते त्याला पहिला धक्का अण्णा भाऊंनी आपल्या साहित्याने दिला. जीवनाचे एक दुर्लक्षित असे सवर्णांकडून झाकून ठेवले जाणारे रूप उघड केले.

अण्णा भाऊ जात्याच कलावंत. शाहिरी तमासगिरीचा परिचय त्यांना वाटेगाव परिसरात झाला. ते पेटी, बुलबुलतरंग वाद्ये उत्तम वाजवीत. वाटेगाव, बर्डे गुरुजी या स्वातंत्र्यसैनिकाचे गाव. अण्णा भाऊंच्या कथा कादंबऱ्यात गुंडगिरी, चोऱ्या, इंग्रजांविरुद्ध लढा, सामान्यांचा जीवनसंघर्ष याचं चित्रण आहे. बर्डे गुरुजींवर ‘मास्तर’ कादंबरी बेतली आहे. वारणा, कृष्णा नदीच्या परिसरातील माणसे इथे आहेत. इंग्रजांच्या आशीर्वादाने क्रिमिनल गुंड पोसले जात होते. या गुंडांची गुंडगिरी, त्यांनी स्त्रियांच्या अब्रूवर घातलेले दरोडे, गुंडांची व्यसनाधीनता, स्वातंत्र्य सैनिकांचा लढा, यांचे त्यांच्या कथा कादंबऱ्यातून चित्रण झाले. ‘राम रावण युद्ध कथेत कुंडलवाडी गावातील मुसळे-ठोमरे गटातील संघर्षाचे चित्रण आहे. ‘धुंद रानफुलांचा’ कादंबरीत स्वातंत्र्य लढ्याचे वर्णन आहे. धुंदच्या प्रस्तावनेत ते म्हणतात,

‘बंदूक ठासून उठे शेतकरी तेली तांबोळी ।
गुलामगिरीची होळी पेटवून मारी गोळी ।।

सर्वसामान्य लोकांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी जो लढा उभारला त्याचं रोमांचक वर्णन अनेक कथा कादंबऱ्यातून त्यांनी केले.

त्यांच्या कथा कादंबऱ्यातील नायिका सुंदर, आखीव-रेखीव व बांधेसूद आहेत. या नायिका शीलसंपन्न आहेत. ‘आबी’ कथासंग्रहातील आबी खलनायकाच्या डोक्यावर जोतिबाची पायरी घालून त्याला ठार मारते. ‘डोळं’ कथेतील नायिकेचे डोळे खूप सुंदर आहेत. या सौंदर्याने तिचा घात केला. गावटगे तिच्यामागे लागतात. तिचा नवरा संशयी असतो. शेवटी ती स्वतःचे डोळे फोडून घेते, कारण या डोळ्यांमुळे नांदणं गेले, इज्जत गेली व बापाला कलंक लागला. ‘अलगूज’, ‘वैजयंता’ या कादंबऱ्या सुंदर प्रेमकथा आहेत. ‘वारणेचा वाघ’ कादंबरीचा नायक सत्तू परिस्थितीमुळे दरोडेखोर बनतो. सत्तू भांडवलदार श्रीमंतांचा कर्दनकाळ व गरिबांचा वाली आहे. त्यांच्या कथा कादंबऱ्यातील वातावरण ग्रामीण आहे.. ग्रामीण जीवनातील रंगढंग, पाटील-कुलकण्र्यांचा मुजोरपणा, गरिबी, जातीयता त्यांचे त्यांनी चित्रण केले आहे. पोटभर अन्न मिळणे हीच येथील मोठी समस्या आहे. ‘फकिरा’ कादंबरीत इंग्रज, फकिराच्या घराची झडती घेतात. गाडगी, मडकी, याबरोबर घरात शेरभर धान्य असल्याचा उल्लेख जप्तीत होतो. एकीकडे श्रीमंतीचा उन्माद, दुसरीकडे झाडपाला खाऊन जगणारी माणसे तिथे आहेत. खेड्यांप्रमाणे शहरी भागांतील झोपडपट्टीतील पात्रे त्यांनी रेखाटली. ‘चिरागनगराची भुते’ या कथासंग्रहातील भुते मुंबईच्या झोपडपट्टीतील आहेत. ही कष्टकरी भुते आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘ही भुतं मी जवळून पाहिली आहेत. ती माझी दोस्त आहेत, नव्हे मी त्यातलाच आहे.’ या भुतावर फकीर, आंधळे, पांगळे, लुळे. फिरस्ते, भिकारी, कागद व चिंध्या गोळा करणारे आहेत. इथे दारू, पाणी व अन्न आहे. त्यांच्या चुली कधीच पेटत नाहीत. पाव-मिसळ त्यांचे पक्वान्न आहे. या भुतांना मोहनशेठ दारू पाजतो. इथे देहविक्रय करून पोट जाळणारी मंकी आहे. हप्ता घेणे एवढीच इथल्या पोलिसांची ड्युटी आहे. दारूला पैसे नाहीत म्हणून इथल्या एका भुताने २० रुपयांसाठी नसबंदी करून घेतली.

‘खुळंवाडी’, ‘बरबाद्या कंजारी’ हे कथासंग्रह लोकप्रिय झाले. बरबाद्या इंग्रजी, रशियन, जर्मनी, झेक, पोलिश भाषेत लोकप्रिय झाला. ‘तुम्ही कथा कशा लिहिता ?’ असा प्रश्न एका रशियन मासिकाने विचारला. ‘बरबाद्या कंजारी’च्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्याबाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो.’ ‘प्रायश्चित’ कथेत सुभद्रा, लीला या सख्ख्या बहिणींचा दारूच्या नशेत भाऊच उपभोग घेतात. त्यामुळे आत्महत्येचे प्रायश्चित त्यांना घ्यावे लागते. ‘स्मशानातलं सोनं मधील भीमा पोटासाठी स्मशानातल्या मढ्याच्या सोन्यावर जगतो. अण्णा भाऊंनी ४० कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी फक्त ३२ उपलब्ध आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स या त्यांच्या लिखाणामागील प्रेरणा आहेत. त्यांनी देव, दैव, धर्म नाकारले. विज्ञानदृष्टी अंगीकारून त्यांनी लिखाण केले. ‘माकडीचा माळ’मध्ये भटक्यांचे जीवन आहे. ‘चंदन’मध्ये स्त्री व भटक्यांच्या व्यथा आहेत. ‘चिखलातील कमळ मध्ये त्यांनी देवदासी समस्या मांडली. ‘वैजयंता’मध्ये त्यांनी तमासगिरांच्या व्यथा व ‘चित्रा’मध्ये कामगारलढा त्यांनी चित्रित केला. त्यांच्या १० कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले.

#लोकशाहीर म्हणून त्यांचा गौरव झाला. लाल बावटा कलापथकातून त्यांनी जनजागृती केली. शेतकरी, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लेखणी झिजवली. तमाशासाठी ‘लोकनाट्य’ हा शब्द प्रथम त्यांनीच वापरला.

अण्णा भाऊंनी नवे तमाशे किंवा ज्याला वगनाट्य म्हणत त्याचे लोकनाट्य असे नामांतर केले ती गोष्ट फार मजेशीर आहे. पां. तु. पाटणकर यांनी ही गोष्ट सांगितली आहे. ते लिहितात…

‘लोकनाट्य हा तमाशाचा आधुनिक अवतार. लोकनाट्य शब्दाचे जन्मकर्तृत्व मात्र गमतीदार. योगायोगाने अण्णा भाऊंकडे आले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आधीचे दिवस होते ते. महाराष्ट्रापासून मुंबई तोडून ती गुजरातच्या पारड्यात टाकण्यासाठी किंवा स्वतंत्र ठेवण्यासाठी महाराष्ट्रद्रष्ट्या राजकारण्यांची तेव्हा जोरात खटपट चालली होती. अण्णा भाऊ लालबावटा कलापथकाद्वारे लेखणीचे फटकारे अशा संधीसाधू भोंदू व स्वार्थी राजकारण्यांवर व मुंबई शासनावर ओढीत होते. त्यामुळे चिडून जाऊन मोरारजी देसाईनी त्यांच्या कलापथकावर व तमाशावर बंदी आणली. अण्णा भाऊंनी डोके लढविले. त्यांनी ‘माझी मुंबई’ हा वग लाखो कामगारांसमोर सादर केला व सुरुवातीला स्टेजवरून जाहीर केले की, ‘मायबाप सरकारने तमाशावर बंदी आणली आहे. म्हणून आम्ही आज आपल्यासमोर ‘माझी मुंबई’ ‘लोकनाट्य’ सादर करीत आहोत.’ टाळ्यांच्या कडकडाटात व पोलिसांच्या उपस्थितीत तमाशाचे ‘लोकनाट्य’ असे बारसे करण्याचे एक ऐतिहासिक कार्य अण्णा भाऊंनी केले व आपल्या मिस्किलपणाने त्यांनी शासनाला हात चोळीत बसायला लावले.

अण्णा भाऊंनी जवळजवळ १४ वगनाट्ये लिहिली. जुन्या ढंगांच्या तमाशांना नवा वर्गीय बाज दिला. कामगार शेतकरी हे त्यांच्या वगनाट्याचे नायक झाले. गोष्टीरूप कथानकाद्वारे आशयसंपन्न अशा खटकेबाज संवादांची पेरणी त्यात असे. मध्येच लावणी गीते सुसंगतपणे ते सादर करीत. ‘अकलेची गोष्ट’, ‘बिलंदर बडवे, ‘खापऱ्या चोर’ ही त्यांची सुरुवातीची वगनाट्ये खूप गाजली. अण्णा भाऊंचा खट्याळ अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे. विनोदाचा अत्यंत प्रभावी वापर त्यात होता. एकूणच पन्नास ते साठच्या दशकात अनेक पठडीची, अनेक विचारसरणीची कलापथके निर्माण झाली. पण अण्णा भाऊंनी एक विचारसूत्र घेऊन आपल्या कलेद्वारे वर्गीय जाणिवा जनमानसात रुजविल्या. केवळ वर्गीय जाणिवाच नव्हे तर समाजातील अंधश्रद्धा, रूढी यांविरुद्ध देखील त्यांनी आपली लेखणी उचलली. ‘वेड्याचं लगीन’ या वगनाट्यात याचे प्रत्यंतर येते. म्हणजेच माध्यमाची अंगभूत ताकद ओळखून ते त्यांनी वापरले. अण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने जनतेचे कलावंत होते. त्यांनी आपली कला कधीही थेटरात नेली नाही. खऱ्या अर्थाने ते मैदानातील माणूस होते.

जातीय दंग्यावर ते एका शाहिरीत लिहितात,

‘माणुसकी पळाली पार । होऊन बेजार
सुडाची निशा चढून । लोक पशूहुनी बनले हैवान’

जातीय दंग्यावर उपाय सांगताना ते लिहितात,

‘तू ऊठ सत्वर । हे तुडवून दंगेखोर ।
म्हणे अण्णा भाऊ शाहीर । सावरूनि धर ।
तुझी तू शांतीध्वजा सत्वर’

त्यांची ‘मुंबईची लावणी’ गाजली. तमाशात गणेशस्तवन असते. त्यांच्या लोकनाट्यात देशस्तवन आहे.

‘प्रथम मायभूच्या चरणा । छत्रपती शिवबा चरण। स्मरोनि गातो कवना ॥’

गणानंतरच्या गौळणीत राधा-कृष्ण, पेंद्या ऐवजी शेतकरी, कामगार, सावकार अशी पात्रे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल ते म्हणतात,

#जग_बदल_घालुनी_घाव_सांगून_गेले_मला_भीमराव ।

गुलामगिरीच्या या चिखलात । रुतून बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी । घे बिनीवरती धाव ।।

धनवंतांनी अखंड पिळले । धर्माधांनी तसेच छळले ।
मगरीने जणू माणिक गिळिले । चोर जाहले साव ।।

ठरवून आम्हा हीनकलंकित। जन्मोजन्मी करुनी अंकित।
जिणे लावुनी वर अवमानित । निर्मून हा भेदभाव ।।

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्र निर्मूनी जगती । करी प्रकट निज नाव ।।

अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यविश्वातले एक मौल्यवान रत्न आहे. क्रांती त्यांच्या साहित्याचा मूलमंत्र आहे. गावोगाव त्यांचे पुतळे उभे राहिले. ते ४९ वर्षे जगले. त्यांचे साहित्य जगभर पोहचले. भारतातील जवळजवळ सर्व भाषांत त्यांच्या कथा-कादंबऱ्या भाषांतरित झाल्या. वाटेगाव या त्यांच्या जन्मगावात महाराष्ट्र शासनाने अण्णा भाऊंवर शिल्पसृष्टी उभारली आहे. त्यांचे जीवन, त्यांच्या कथा-कादंबऱ्यातील पात्रे, प्रसंग सजीव होऊन आपल्याशी बोलू लागतील, इतकी अप्रतिम शिल्पसृष्टी वाटेगावमध्ये साकारलेली आहे.

अण्णा भाऊ एक प्रतिथयश कलाकार होते. ‘लोकशाहीर’ ही उपाधी या कलावंताला लोकांनी दिली होती. अण्णा भाऊंची एक हृद्य आठवण सांगताना प्रा. चंद्रकुमार नलगे लिहितात की…

“१९६८ मध्ये मला मुंबईला जाण्याचा योग आला. ‘अंगाई’ नावाचा चित्रपट माझ्या कथासंग्रहावर निर्माण होत होता. त्याच्या संकलनासाठी मुंबईत मी. महिनाभर राहणार होतो. त्यावेळी बॉम्बे लॅब म्हणजे चित्रपटांचे माहेरघरच होते. एके दिवशी मी वामन होवाळ यांना म्हटलं, ‘मला अण्णा भाऊंना भेटण्याची तीव्र इच्छा आहे.’ मला मुंबई माहीत नव्हती. होवाळ आणि मी गिरगावच्या चिरागनगरकडे निघालो, चिरागनगर म्हणजे छोटया छोटया झोपड्यांची दाट वस्ती. सगळीकडे डास आणि माशा. गटारपाण्याने वेढलेल्या एका झोपडीत आम्ही पोहोचलो. ती झोपडी पाहून मी तर थरारलोच कोनाडे कोळी कोष्टकांनी भरलेले, इतस्त पडलेले कागद, कोपऱ्यात मॅक्सीम गोर्कीचा छोटा पुतळा. तुटलेल्या कात्यांची एक बाज, त्या बाजेवर अंगात दडक, लुंगी घालून व्यग्र चेहऱ्यानं अण्णा भाऊ लिहीत बसले होते. आम्हाला पाहताच त्यांना आनंद झाला, पण तो मला कसासाच वाटला. त्यांनी चटई झटकून आम्हाला बसवलं.

मी अण्णा भाऊंना म्हटलं, ‘तुम्हाला तर मंत्री राजारामबापू पाटलांनी फ्लॅट दिला आहे, असं मी ऐकलं आहे. तुम्ही इथे कसं काय राहता?’ अण्णा भाऊ म्हणले, ‘मी तो नाकारला. कारण माझी माणसं इथं आहेत. ही मोठ्या दिलाची माणसं आहेत. त्यांचं जगणं खरं आहे. या जगण्यावर माझा जीव आहे. या जिवंत माणसांना सोडून गेलो तर माझी प्रतिभा अटेल, सुखद् खाशी झोंबाडून जीवनाशी लढा देणारी इथली माणसं मी सोडून गेलो, तर मी जिवंत राहणार नाही, माझी लेखणी थंडावून जाईल.’

अण्णा भाऊंना लिहिताना मी तेव्हा पहिल्यांदा पाहात होतो. ते एकटाकी लिहीत होते, कुठेही खाडाखोड नाही की बदल नाही. अक्षर मात्र काहीच ओळखू येत नव्हतं. दहा दहा पाने लिहून झाली की लगेच ती पुण्याला पाठवली जात होती. पुण्यात त्या कादंबरीचं कंपोजिंग सुरू होतं. आणि इकडं अण्णा भाऊ लिहीत होते. कादंबरीतील पात्रांचा मागचा पुढचा संदर्भ त्यांच्या डोक्यात पक्का असे. प्रकाशकांचा लेखनासाठी तगादा लागलेला असे. मात्र मानधनाची सगळी बोंबाबोंब होती. तितक्यात एक सुटाबुटातला माणूस त्या झोपडीत आला. कदाचित तो निर्माता असावा. कित्येक निर्मात्यांनी केवळ एका बाटलीत एका एका चित्रपटाच्या कथा अण्णा भाऊंकडून पळवल्या हे मी त्यापूर्वी बरेच ऐकून होतो.

मी खिन्नपणे महाराष्ट्राच्या या महानायकाचा निरोप घेतला. परत येतानाच्या प्रवासात माझे मन म्हणू लागले, ‘घाव घालूनी जग बदलण्याची भाषा करणारा या कलंदर माणसातला एक जरी गुण इतरांकडे असता तर त्याने घराचे गोकुळ केले असते. सोन्याची द्वारका उभी केली असती. पण हा कलावंत ऐहिक जीवनाच्या पलीकडे गेलेला होता. समाजासाठी या माणसानं खूप केलं, पण स्वतःसाठी, मुलासाठी काहीच केलं नाही.’

अण्णा भाऊ रोज बॉम्बे लॅबला येत असत. दुपारी आमचा गप्पांचा फड होई. त्यात एकच विषय असे ‘वारणा खोरं आणि त्यातली माणसं. बघता बघता महिना संपत आला. मला दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला यावं लागणार होतं. मी अण्णा भाऊंना म्हणालो, ‘मी उद्या कोल्हापूरला निघणार आहे.’ अण्णा भाऊ एकदम खिन्न झाले. म्हणाले, ‘तुम्हीपण निघालात?’ दुसऱ्या दिवशी दादरच्या दुर्गा हॉटेलात आम्ही दुपारी जेवण्यास गेलो. अण्णा भाऊंचे जेवण्यात लक्ष नव्हतं. आम्ही दोघं प्लाझासमोर उभे होतो. आम्ही एकमेकांकडे पाहिलं, दोघांचे डोळे डबडबले होते. मी खिशात हात घातला. हाताला येतील तेवढे पैसे मी अण्णा भाऊंच्या हातात ठेवले. ज्या माणसाने कादंबऱ्यातील आपल्या पात्रांच्या हातात भाले, बरच्या, तलवारी आणि बंदुका दिल्या त्या वारणेच्या ढाण्या वाघाचा हात थरथरत होता. मी अण्णा भाऊंच्या पायाला हात लावून नमस्कार केला. अण्णा भाऊ पुलावरून चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बराच वेळ पाहात राहिलो.

काही दिवसांनी अण्णा भाऊंचे दोन ओळींचे पत्र आले. ‘प्रिय चंद्रकांत, तुझ्याकडे मधूला पाठवत आहे. मदत करावी.’ अण्णा भाऊंचा मुलगा मधू वाटेगावला राहत असे. तो माझ्याकडे कोल्हापूरला बऱ्याचदा येत असे. त्याला मी अडचणीला मदत करत असे. पुढे दोनच महिन्यात वार्ता कळली की अण्णा भाऊ गेले. मी मनात म्हणालो… भारताचा गॉर्की गेला !”

आयुष्यभर दारिद्र्य, बेकारी, उपासमारी याच्याशी संघर्ष करणाऱ्या आणि समाजासाठी जगणाऱ्या अण्णा भाऊ साठेंना शेवटी शेवटी आपल्या माणसांचा आपुलकीचा, मायेचा आधार राहिला नाही. मृत्यूच्यावेळी अण्णा भाऊ एकाकी होते. एक निराधार, बेवारस, एकाकी स्थितीत त्यांना मृत्यू आला. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ कुणीही नव्हते. निद्रीस्त समाजाला जान आणण्याइतका जोश त्यांच्या लेखनात, शाहिरीत होता. माणसांमध्ये रमणाऱ्या आणि सदैव लोकसमुहात वावणाऱ्या हाडामासाच्या कलावंताला मृत्यूपूर्वी आलेले एकटेपण. हे अण्णा भाऊंचे एकटेपण, एकाकी असणे जिवाला चटका लावणारे होते. त्यांची उपेक्षा समाजाने केली, शासनाने केली, मृत्यूनेही त्यांची उपेक्षा केली. मृत्यूसमयी लिहिलेली अर्धवट पाने वाऱ्यावर फडफडत होती. फडफडणारी पाने खोलीभर पसरली होती. एका काथ्याच्या बाजेवर त्यांचे निस्प्राण शरीर पडले होते. रात्री कधीतरी त्यांचा प्राण गेला होता. खोलीच्या कोपऱ्यात असणारा #मॅक्झिम_गॉर्कीचा छोटासा पुतळा धीरगंभीर होऊन त्यांच्या प्रेताकडे पहात होता. पुस्तके, लिखाणासाठी घेतलेला कागद, चारदोन कपडे, पाण्याचा एक मातीमाठ एवढाच संसार होता.

पहाट सरली. सकाळ झाली. झोपडपट्टीत माणसांची वर्दळ सुरू झाली. अण्णा भाऊंची झोपडी शांत होती. येणाऱ्या जाणाऱ्याला अण्णा भाऊ झोपले असावेत, असे वाटले. अण्णा भाऊंकडे लक्ष देण्याइतपत वेळ कुणाला होता? झोपडीत काहीच का हालचाल नाही म्हणून कुणीतरी शेजाऱ्यांनी डोकावून पाहिले. लाकडी बाजेवर अण्णा भाऊंचे कलेवर पडले होते. अण्णा भाऊ शांत होते. श्वासोच्छवास नव्हता. एका महान साहित्यिकाचा अंत झाला होता. तो दिवस होता १८ जुलै, १९६९. त्यांच्या पार्थिव शरीराचा तो अंत होता. त्यांची शाहिरी. त्यांच्या कथा, कादंबऱ्या अजरामर आहेत. अण्णा भाऊ श्रमिकांचे लेखक होते. त्यांचा श्रमिक गरीब होता, भुकेकंगाल होता पण लाचार, हीन दीन किंवा दुबळा नव्हता. त्यांचा श्रमिक, लढाऊ अन् बाणेदार होता. अण्णा भाऊंनी आपल्या पात्रांच्या हातात भाले, तलवारी, कुऱ्हाडी, बंदुका दिल्या. त्यांचा नायक नतमस्तक, दीनदुबळा नव्हताच. अण्णा भाऊंचा मृत्यू त्यांच्या नायकासारखाच होता…. कण्हत कुढत, लाचारी स्वीकारलेला अथवा झिजून झिजून झालेला तो मृत्यू नव्हता. श्रमिकांच्या श्वासात, नसानसात आजही अण्णा भाऊ साठे जिवंत आहेत. त्यांना त्रिवार वंदन!

अण्णा भाऊंना अभिवादन करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, अण्णा भाऊ केवळ भूतकाळात रममाण झाले नाहीत. समकालीनत्व हा त्यांच्या एकूण लेखनाचा गुणविशेष होय. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’, ‘पंजाब दिल्लीचा दंगा’, ‘बंगालची हाक’ हे पोवाडे असोत किंवा ‘उपकाराची फेड’, ‘सापळा’ सारख्या कथा ज्या बौद्ध धर्मांतरांच्या पार्श्वभूमीवर लिहिल्या या त्याची साक्ष आहेत. आपल्या वर्गाशी आणि काळाशी इमान राखून युगसुसंगत अशी जीवनमूल्ये अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून मांडली. किंबहुना त्यासाठी ते लढले देखील. अण्णा भाऊंना जी जीवनमूल्ये भावली तिला त्यांनी आपल्या लेखनातून काटेकोरपणे जपलेले आढळते. गिरणी कामगारांत उत्तर भारतीय ज्यांना आपण ‘भय्ये’ म्हणतो अशा कामगारांचा मोठा भरणा होता. ते देखील गिरणी कामगारांच्या लढ्यात ते कामगार म्हणून सहभागी व्हायचे. जेव्हा ‘मराठी माणूस’ म्हणून गिरणी कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सामील होतात तेव्हा लाल मातीत तयार झालेले गिरणी कामगार कार्यकर्ते त्या भैय्यावर परप्रांतीय म्हणून हल्ला करीत नाही, तर त्याला शिवाजी पार्कच्या सभेत ते घेऊन जातात व लढ्यात सामील करतात. ‘माझी मुंबई’ अर्थात मुंबई कुणाची या वगात अण्णा भाऊंनी हे मांडले आहे. आज मराठी माणसाच्या नावाने उत्तर भारतीयांवर हल्ले करणाऱ्यांना ही एक प्रकारे चपराकच होय. अण्णा भाऊंना वर्गीय दृष्टिकोन होता. म्हणूनच ते असे लिहू शकले हे निर्विवाद महाराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घटना त्याच संवेदनेने अण्णा भाऊ चित्रित करतात. अन्यायाविरुद्ध संघर्ष हा तसा अण्णा भाऊंच्या लेखनाचा स्थायीभाव पण कुठेही आक्रस्ताळेपणा, उरबडवेपणा, द्वेष, विखारीपणा त्यांच्या लेखनात जाणवत नाही. संयम आणि समर्थपणे ते घटनांचा अन्वयार्थ लावतात. विनोदांच्या अंगाने जाणाऱ्या वगनाट्यात आणि अनेक कथांत देखील त्यांनी हे सूत्र सोडलेले नाही.

#बाबासाहेब_आंबेडकरांनी मनमाड येथे १९३८ साली रेल्वे कामगारांसमोर भाषण करताना सांगितले होते, आपले दोन शत्रू आहेत एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात हे दोन शत्रू वेगवेगळ्या स्वरूपात जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकणाऱ्या विचारात आहेत. आज जरी महानगरीय संवेदना बोथट झाल्या असल्याचे जाणवत असले तर ग्रामीण भागातील सर्व थरातील लेखक, कलावंत त्यांच्या त्यांच्या पातळीवर या शोषणाचा अन्वयार्थ लावू लागले आहेत. गोरगरीब कामगार, शेतकरी, दलित, वंचितांना त्यांचे माणूसपण नाकारण्याच्या प्रक्रियेकडे आजची व्यवस्था वाटचाल करू पाहत आहे. गांभीर्याची गोष्ट ही की जातीच्या, धर्माच्या नावावर विद्वेष पसरविणाऱ्या शक्ती आक्रमकपणे डोके वर काढीत असताना दिसतात.

सध्याच्या काळात चळवळीतील सर्व कलावंत, लेखक, कार्यकर्ते, विचारवंत यांनी एकत्र येऊन प्रदीर्घ पल्ल्याची सांस्कृतिक क्षेत्रातील लढाई लढण्यासाठी आपल्यातील पुसट अशा रंगछटा विसरून या सांस्कृतिक लढाईचा किमान कार्यक्रम ठरवून त्या लढाईला सुरुवात करण्याची गरज आहे. आणि तेच #लोकशाहिर_अण्णा_भाऊ_साठे यांना अभिवादन ठरेल…

सौजन्य:- बाळासाहेब कदम

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close